निर्भय होउन मिरवू का? - निशिकांत

निर्भय होउन मिरवू का?
 ( महिला दिनाच्या निमित्ताने पोकळ गोडवे गाऊन कविता लिहिण्यापेक्षा सद्यःस्थिती सांगणे जास्त चांगले या भावनेने लिहिलेली कविता. शेवटचा सकारात्मक आणि बंडखोर भाव आजकाल बघावयास मिळतो  हे खूप आशादायक आहे. )

जगास निष्ठुर, कळी विचारी
"मला जरा मी फुलवू का?"
उत्तर द्या मज सवाल करते
"निर्भय होउन मिरवू का?"

तारुण्याच्या उंबरठ्यावर
थवे हजारो भ्रमरांचे
अंगचटीला लगेच येती
झुंड केवढे नजरांचे !
एकविसाव्या शताब्दीतही
घरी मला मी लपवू का?
उत्तर द्या मज सवाल करते
"निर्भय होउन मिरवू का?"

दरवळ देते जरी जगाला
कैद भोगते काट्यांची
गर्भामधल्या स्त्रीभ्रुणासही
भीती नात्यागोत्यांची
"जन्माआधी दे मज मृत्त्यू"
भगवंताला विनवू का?
उत्तर द्या मज सवाल करते
"निर्भय होउन मिरवू का?"

कधी अहिल्या, कधी द्रौपदी
कधी जानकी झाले मी
पटो ना पटो, जसे शिकवले
मनास मारुन जगले मी
वेष्टनात मी चांगुलपणच्या
पुन्हा स्वतःला सजवू का?
उत्तर द्या मज सवाल करते
"निर्भय होउन मिरवू का?"

रूप दिले, सौंदर्य दिले पण
स्वर्गामध्ये मान कुठे?
दरबारातिल जरी अप्सरा
आम्हाला सन्मान कुठे?
नाचत आले प्रश्न पुसता
"देवांना मी रिझवू का?"
उत्तर द्या मज सवाल करते
"निर्भय होउन मिरवू का?"

तोडुन आता परीघ सारे
संचारावे मुक्त जरा
घट्ट होउनी, गुंडांशी का
ना वागावे सक्त जरा?
गिधाड दिसता, भररस्त्यावर
धींड काढुनी फिरवू का?
उत्तर द्या मज सवाल करते
"निर्भय होउन मिरवू का?"


#निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

1 comment:

@मराठी कविता आणि चारोळ्या २०१७. Powered by Blogger.